Don't Stop When You Are Tired, Stop When You're Done



























सायकलिंग हे एक व्यसन आहे आणि प्रत्येक सायकलिस्ट हा एक व्यसनाधीन व्यक्ती!*





आता मात्र तुम्हाला राग आला असेल. अरे लिहिता येतं म्हणून काहीही लिहायचं? साहजिकच आहे ते. पण जसजसं आपण कथेत पुढं सरकू तसतसं तुम्हालाही माझ्या उपरोक्त विधानाच्या सत्यतेची खात्री पटेल.





शनिवारी रात्री अरुण भाऊ काळेंचा  फोन आला. *उद्या काय करताय?*





वास्तविक हा रविवार *ट्रिपल SR गणेश माळीच्या* २१००० हजार kms पूर्ती निमित्त R2G2 ग्रुप ने आयोजित ride चा दिवस. पण खुद्द सत्कारमूर्तीच व्यवसायानिमित्त व्यस्त असल्याने ठरलेला कार्यक्रम फिस्कटला आणि गणेश, रतन, रामदास, डॉ राहुल, किरण आणि समीर सर या दिग्गजांच्या सोबत ride करण्याचं माझं स्वप्न तूर्त तरी अपूर्णच राहिलं.





काही विशेष नाही. Ride ला जायचं आहे. पण मार्ग नाही ठरवला अजून--मी बोललो.





*सकाळी शार्प ६ ला तयार रहा. मी येतो विंचुरीला. मग आपण जाऊ.* 





अरुण भाऊ म्हणजे अस्सल मराठमोळा रांगडा गडी. पटलं तर जीवाला जीव देणारा, पण बिनसलं तर समोरच्याला कच्चा खाणारा. एक सळसळणार्या रक्ताचा तरुण. कायम त्याच्याशी बोलताना-वागताना मी एक लक्ष्मणरेषा पाळतो. अश्या मनस्वी माणसाला चुकूनही दुखवू नये ही त्यामागची ईच्छा.





बरं भाऊ, राहीन तयार बरोबर ६ ला. या तुम्ही.---मी बोललो.





८-१० दिवसापूर्वी अचानक सायकलिंग करत असताना मला मूत खड्याचा त्रास सुरू झाला. मोठमोठे घाट चढणारा हा गणेश-रतन-रामदास चा चेला एका साडेसात मिलिमीटर खड्याने पुरता हतबल झाला. माझे सायकलिंग गुरू *डॉ शिरीष घन* बोलले--सायकलिंग चालू ठेव, स्टोन पडायला मदत होईल. साधारण एक हफ्ता आराम करून पुन्हा मी सायकलिंग सुरू केली.





स्वारी बरोबर ६ला माझ्या घरी हजर. लगेच आम्ही पुढं निघालो. घोरवड घाटाला अजिबात भीक न घालता आम्ही वेगात सिन्नर गाठलं. अरुण भाऊ ने सायकल पुण्याकडे वळविली. पाठोपाठ मीही होतोच. दोडी सरलं, नांदूर शिंगोटे पार केलं. एका signboard जवळ आम्ही थांबलो. 





कुठं जायचं आहे अरुण भाऊ आज? मी विचारलं. काहीच न बोलता अरुण भाऊ ने बोर्ड कडे बोट केलं. 





*घारगाव ५६ किलोमीटर*





....अन सर्रकन मी भूतकाळात गेलो.





नाशिक BRM २०० 


नाशिक--घारगाव--नाशिक


नोव्हेंबर २०१९





भयंकर उन्हाचा त्रास झाला ह्या ride मध्ये. ही BRM कायम मला आठवेल ती दोन गोष्टींमुळे





*सिंगल गियर सायकल घेऊन ही ride complete करणाऱ्या ६० वर्षे वयाच्या चिरतरुण वारुंगसे भाऊ ला मागे टाकण्याचे माझे सर्व प्रयत्न फसल्यामुळे आणि*





*पूर्ण ride सायकल ब्रेक अटकत असूनही ride complete करणारा आणि फक्त ५ मिनिटे उशिरा पोहोचल्याने DNF (did not finish) झालेला लढवैय्या अरुण भाऊ मुळे.*





अच्छा, त्या दिवसाचा वचपा काढायचा आहे साहेबांना आज. चला तर मग.





सकाळचा जोश, सोबत पार्टनर. आम्ही सटासट रस्ता मागे टाकत होतो. तेवढयात पलीकडून आरोळी आली. आम्हीही हात केला. संगमनेर चे सायकलिस्ट गुंजाळ सर आणि त्यांचा ग्रुप होता तो. गँग त्रंबकेश्वर निघालेली दिसतेय असा आम्ही अंदाज केला.





संगमनेर ला नास्ता केला आणि निघालो आम्ही पुढे. मी हेल्मेट घरीच विसरलो होतो. ऊन पडू नये ही मनोमन प्रार्थना चालू होती. घाटाला कच्चा असणारा मी सोबत आहे पाहून अरुण भाऊने मला पुढं चालायला सांगितलं. मागच्या ride मध्ये ह्याच घाटात गलितगात्र होऊन मी सावलीला थांबलो होतो. आजही ऊन पडलं होतं. पण देव जाणे काय जोर आला आणि आम्ही चंदनापुरी घाट हाहा म्हणता पार केला. मनाचे वारू चौफेर उधळले आणि आम्ही घारगाव मिडपॉईंट १२ला गाठला.





१५मिनिटांचा ब्रेक घेऊन लगेच माघारी फिरलो. भयाण उन्हाचा तडाखा सोसत आम्ही टोल प्लाझा गाठला. दर १५-२० किमीला आम्ही hydration ब्रेक घेत होतो. अरुण भाऊ त्याची फोन cable विसरला होता. फोन डिस्चार्ज होण्यावर आला होता. Ride चा रेकॉर्ड जाऊ नये म्हणून आम्ही सायकल संगमनेर मध्ये टाकली. Cable मिळाली. आता पर्यंतचा आमचा स्पीड होता २०.८ चा.





संगमनेर मध्ये गेलो आणि आठवण पोहे नाही खाल्ले असं होणार नाही. पोह्यानंतर राजहंस ताक....वाह!! स्वर्गसुख.





गेल्या ५-१० किमी पासून मूत खडा त्रास देत होता. पण बोललं तर हा माणूस म्हणेल ride परत करता येईल. कोणत्यातरी गाडीत सायकल टाकू आणि जाऊ घरी.





संगमनेर सोडलं आणि भाऊ पुढे दिसेनासे झाले. दूरवर ऑरेंज जर्सी म्हणजे अरुण भाऊ. नंतर नंतर तर तिही दिसेनाशी झाली. मला सोडून जातो की काय हा विचार मनात डोकावला आणि भीतीने जोरात पेडल्लिंग सुरू झालं. भर उन्हात करहे घाट पार केला. पुढं सावलीत अरुण भाऊ थांबलेला पहिला आणि माझा जीव भांड्यात पडला. आता पुढे खरी कसरत होती. इथून पुढे थेट सिन्नर पर्यंत रस्ता कायम न सरणारा म्हणून प्रसिद्ध आहे. डोक्यावर ऊन तरी तळपेल, headwind नाहीतर crosswind तरी लागेल.





पण ही आमची BRM वेळेत करायचीच म्हणून आमचा ठाम निर्णय झाला होता.





विधात्याने आकाशात एक वेगळाच खेळ मांडला होता. घडीत ऊन पडे तर  घडीत सावली. मग आम्हीही डाव रंगवला. मी जोर करायचो आणि अरुण भाऊला मागे टाकायचो. एव्हाना मला कळलं होतं, अरुण भाऊ ची ताकत सपाट रस्ता तर मी चढाला मजबूत होतो. Rear mirror मध्ये नजर ठेवून मी सायकल पळवायचो. पण सहज हार जाणार तो अरुण भाऊ कसला. क्षणात तुफान वेगाने मला पार करायचा आणि पुढे दिसेनासा व्हायचा. सिन्नर येता येता माझी दमछाक झाली होती. अहो पाणी प्यायचं आहे सांगूनही ह्या माणसाने दोडी ते सिन्नर बायपास मला पळवलं. शेवटी चमोली सरांनी एकदा केलं होतं तसं मी केलं. मला बाकी माहीत नाही. थांबा म्हणजे थांबा. नाईलाज होऊन अरुण भाऊ थांबला.





निवांत पाणी पीत असतांना मला सांगितलं की करहे घाटात पायात cramp आला होता. म्हणून थांबले  आणि जोरात काडी पण टोचून घेतली होती. अजब माणूस आहे हा. 





घाट उतरलो आणि अरुण भाऊ चे २०० किमी पूर्ण झाले. चक्क ४५ मिनिट आधी. त्यांनी आरोळी ठोकून आपला आनंद साजरा केला.





पुढे निघाले आणि पलीकडून आवाज आला. गुंजाळ सर परतीच्या मार्गात होते. त्यांची आणि त्यांच्या टीमची ओळख झाली. सायकलिस्ट चं विश्व मर्यादित असतं. प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या ride चा सहकारी असतो. संदर्भ ही छान दिला जातो. *अरे तो नाही फलाण्या फलाण्या ride ला होता...* गंमतच असते ती एक.





शेवटी त्यांचा निरोप घेत मी अरुण भाऊला म्हटलं आता मी जातो शिंदे toll प्लाझाहुन घरी. तुम्ही जा सरळ. क्षणात  अरुण भाऊ बोलला *डॉक्टर, मी थकलो आहे. मला नाशिक रोड पर्यंत खेचून न्या. मागे पडू देऊ नका.*





थकलेला चेहरा पाहून माझ्या काळजात धस्स झालं. पूर्ण दिवस मला खेचणारा माझा दोस्त खरच थकला होता. अश्या वेळी धीर द्यायचा असतो. अरुण भाऊ, तुम्ही अजून १०० किमी सहज मारू शकता. चला व्हा पुढं. पुढची roller coaster ride आम्ही जोश मध्ये सुरू केली. पळश्या च्या पुढे ट्रॅफिक ने जीव मेटाकुटीला आणला. बिटको पॉईंट ला आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. आजच्या ride बद्दल, ride च्या आनंदाबद्दल त्यांचा आभार मानले आणि सायकल भागूरकडे वळवली. उसनं अवसान गळून पडलं आणि गलितगात्र झालेला मी हळूहळू विंचुरीला रवाना झालो ते आजच्या ride च्या धुंदीत. सांगा बरे हे एक प्रकारचं व्यसन नाही तर काय आहे. सारखं हवहवसं वाटणारं. मनाला वेगळं समाधान देणारं......






*होय आम्ही सायकलिस्ट एकजात व्यसनी आहोत!!!*








DR ANIL KANADE











Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आठवणीतला म्हाळशेज....

ये कहॅा आ गये हम..यॅूं ही साथ साथ चलते

What did I learn from this lock down ?........