आठवणीतला म्हाळशेज....


*आठवणीतला म्हाळशेज*

कोविड ने सर्वांप्रमाणे माझंही मत परिवर्तन केलंय. २०२० च्या ऑगस्टला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना बेड वर पडल्यापडल्या *त्या गवाक्षातून* बाह्य जग न्याहाळताना मनाशी पक्की खूणगाठ बांधली, इथून जिवंत बाहेर पडलो तर त्या सर्वांना फोन करेन ज्यांच्याशी मी अबोला धरला आहे, त्या सर्वांना मोठ्या मनाने माफ करेन ज्यांनी मला दुखावलं होता, आणि माझ्या मेडिकल कॉलेजच्या मित्रांना आवर्जून भेटेल ज्यांना काही न काही कारणास्तव गेली २३ वर्षे भेटू शकलो नाही. त्या सर्वांमध्ये जाईन, राहीन आणि सर्वांना कुठलाही आडपडदा न ठेवता आवर्जून सांगेन की मित्रांनो, तुम्हा सर्वांशिवाय हा अनिल अपूर्णच आहे.

नियतीला हे सर्व मान्य होतं आणि मी सुखरूप हॉस्पिटलतून बाहेर पडलो. सर्वांना स्वतःहून फोन केला. मी सुखरूप आहे सांगितलं आणि लवकरच भेटण्याचं वचन दिलं.

वायदे करणं सोपं असतं, ते पाळणं कठीण असतं. नेहमीचं रहाटगाडगं चालू झालं आणि मी त्यात व्यस्त झालो. पण पूर्वीसारखं जीव काढणं सोडून दिलं. मनाला वाटेल आणि पटेल तेच करणं सुरू केलं.

गेट टू गेदर चा मेसेज ग्रुप वर पडला. *गोवा.*  ईच्छा असूनही मी सहभागी होऊ शकत नव्हतो. फीस ही आवाक्या बाहेर होती. वेळ आणि पैसा- दोन्ही दृष्टीने मला गोवा जाणं शक्य नव्हतं. मन थोडं खट्टू झालं. पण काही कारणास्तव ती टूर कॅन्सल झाली. आणि मी पुढच्या गेट तू गेदर ची वाट पाहू लागलो.

ग्रुप वर फोटो आले. संदीप ने टाकले होते. भन्नाट डेस्टिनेशन. म्हाळशेज घाट. मी कधीच तिकडे नाही गेलेलो. सुनीताला सांगितलं. जायचं आपण. ती आश्चर्यचकित झाली. बघू म्हणाली.

रूपेश, जयंत आणि सुनील रिसॉर्ट बघून आले. डेस्टिनेशन फायनल झालं. फीस ही माफक. सुनीताला सांगितलं. मी चाललो आहे, तुला यायचं का? २३ वर्षांनंतर तिला कसं म्यानेज करायचं हे मला जमतंय. झालं. आम्ही दोघांनी फीस भरून टाकली. ज्यांना ज्यांना आवर्जून भेटावं वाटत होतं त्यांना फोन केले. ह्यावेळेस मी येत आहे, तुम्हीही या. 

ट्रिप च्या दिवशी अंगात उत्साह संचारला होता. माझे सर्व मित्र मैत्रिणी मला भेटणार होते. साधारण १२ला म्हाळशेज ला पोहोचलो. रिसॉर्ट टेकडीवर होता. चढायला सुरुवात केली आणि सुनीताची कुरकुर सुरू झाली. भेटू दे संदीप ला. एवढ्या टेकडीवरचं रिसॉर्ट का निवडलं, विचारतेच त्याला. मीही म्हटलं. त्याला अप्रत्यक्षपणे तुला तुझी फिटनेस लेवल दाखवायची होती. आतातरी व्यायामाला सुरुवात करा. तीही कटुसत्य ऐकून गप्प बसली.

आम्ही वर पोहोचलो आणि ताशा सुरू झाला. ततडम-ततडम. आधी पोहोचलेले सर्व मित्र आमच्या स्वागताला आले. आमच्या गळ्यात हार घातले, आमची गळाभेट घेतली. त्यांच्या सोबत हातपाय वेडे वाकडे फेकून नाचताना मन वेगळ्याच आनंदात रमलं होतं. लगेच त्यांनी आम्हाला सावलीत नेलं आणि खुर्च्यात बसवलं. वेलकम ड्रिंक दिलं आणि गप्पाची मैफल रंगली. संदीप चा गुलब्या, जयंत चा जेड्या, रूपेश चा रुप्या, जयदीप चा जयद्या किंवा टक्स, कौतुभ चा जाड्या, सॉरी सॉरी, कौस्तुभ चा बारक्या (३०-४० किलो कमी झाल्याने), अनिल च्या अन्या, पंकज च्या पंकुआबा कधी झाला ते कळलंच नाही.

पुन्हा कोणी आलं की आम्ही उठायचो, ताशा वाजायचा, हार घालायचो, गळाभेट घ्यायचो, सोबत थोडं नाचायचं आणि पुन्हा सावलीत बसायचं. कितीही वेळा करावं लागलं तरीही थकलो नाही आणि कंटाळलो नाही. 

बहुसंख्य मित्र मैत्रिणी आलेले पाहून गुलब्याने पत्ते खेळायला काढले. गुलब्या हे संदीपला अरविंद भाताम्बरे प्रेमाने दिलेलं नाव. आम्ही सर्वांनी रिंगण केलं आणि बैठक मारली. १०-१० रुपयाच्या नोटा काढल्या गेल्या आणि मोठे, कसलेले ग्याम्बलर असल्याच्या अविर्भावात आम्ही तीन पत्तीचा डाव सुरू केला. प्रचंड गदारोळात आम्ही झटकन १९९१ मध्ये केव्हा पोहोचलो ते कळलंच नाही. अज्या चं अँजिओप्लास्टी, योग्याचं ए सी एल रिपेअर ऑपेरेशन काही क्षणांत आम्ही विसरलो. आरडाओरड, चिडाचिडी, आरोप-प्रत्यारोप, हातचलाखी सर्व कलांचा यथेच्छ वापर झाला. तास दिडतासाने आम्हाला २५-३० वर्षांचा टाईम ट्रॅव्हल घडवून आणलं.

दुपारचं जेवण झालं आणि पुन्हा बैठक बसली. कोणीतरी शेयर मार्केट चा विषय काढला आणि सर्वांचा सिरीयस मूड झाला. तज्ञ आपापले मत मांडत होते आणि बहुसंख्य आम्ही त्या विषयीचे गाजर ही कळत नसल्याने गप्प बसून ऐकत होतो.

*वयाच्या साठाव्या वर्षी तुमच्याकडे १०० सिआर पाहिजे* कौट्या ठासून म्हणाला आणि आमच्या तोंडचं पाणी पळालं. एकमेकांकडे पाहू लागलो. सगळ्यात जास्त बेकार हाल गिर्या चे होते. संगमनेर चा निष्णात फिजिशियन आ वासून  कौट्या कडे पहात होता. 

*मला सांग, साठाव्या वर्षी १०० सि आर चं काय करणार रे तू जाड्या?* आज्याला फुल चढली होती. कोल्हापूरच्या नामवंत नयुरो फिजिसियन ला, मेडिकल कॉलेजच्या एम एस ने खडा सवाल केला.

*अरे जाड्या काय म्हणतो, बारीक झालो ना मी आता. राहिला विषय पैशाचा. मी काहीही करिन, तुला काय त्याचं. सगळे पैसे मी दान करीन.* कौट्या इरेला पेटला.

*अरे बारक्या, तेव्हा दान करायचे तर आतापासूनच सुरू कर ना? कशाला टाकायचे शेयर मार्केट मध्ये. माझ्याकडे बघ. आय एम गोइंग तो डाय पेपरलेस अँड कॅशलेस.* आज्या नाही, त्याच्या पोटातील दारू बोलली.

कौट्या-आज्याचं द्वंद्व चालू असलेलं पाहून गिर्या हळूच कटला आणि रुपाली जवळ जाऊन बसला. हळू आवाजात त्यांची कुजबुज चालू होती.  रुपालीने शांतपणे त्याला काही टिप्स दिल्या. सरतेशेवटी तिनं त्याला तिचा पोर्ट फोलिओ दाखवला आणि त्याचे धाबेच दणाणले. पुढचा कितीतरी वेळ गिर्या कुणाशीच काही न बोलता शांत कोपऱ्यात बसला होता. एवढया वर्षांत कौट्या काहीच बदलला नव्हता. काहीतरी मोठमोठया जड शब्दात सांगायचं आणि दुसऱ्याच्या भेज्याला भुंगा लावायचा. आपण मस्त गम्मत बघायची. जुनी सवय ती. अजिबात बदलली नाही.

वेळ भुर्रकन उडून जात होता. रात्री डी जे वर डान्स सुरू झालं. कुठला ही संकोच न बाळगता सर्व जण मन मानेल तसे हात पाय उडवू लागलो.

*कुणीतरी मला डान्स शिकवा रे*-जयद्या बोलला.

*काय, डान्स इंडिया डान्स मध्ये भाग घ्यायचा का तुला? जसा नाचतोय तसाच नाच. कोणी बघत नाही तुझ्याकडे.* मी बोललो. जयद्या गप्प होउन पूर्ण वेळ नाचत होता. त्याला मी नेहमीच भेटत असतो. इतका आनंदी फार वर्षातून पहिल्यांदा पहिला.

ती धुंद रात्र, गारवा असला तरी कॅम्पफायर ची ऊब, गुलब्याचा डान्स, नुकताच टाकलेला स्टेंट ही सरकेल असा आज्याचा नाचण्याचा उत्साह, त्याला धमकावून घडोघडी ओढून खुर्चीवर बसवताना झालेली गिर्याची त्रेधातिरपीट, ऐन वेळी रंगात आलेला उम्या, हे सर्व विसरणं केवळ अशक्य आहे.

दुसऱ्या दिवशी सकाळी ट्रेक होता. माझा खांदा दुखत असल्याने रात्रभर झोप नाही झाली. गिर्याला समजलं आणि त्याने रुप्याला बोलावून आणलं. रुप्याने माझ्या खांद्याला पेनकिलर पॅच  लावला आणि आम्ही ट्रेकला रवाना झालो. निवांत चालतांना छान गप्पा झाल्या. एका कड्याजवळ आल्यावर गुलब्या प्रोटेक्टिव्ह मोड वर गेला. सगळ्यांना त्याने तंबी दिली. माझा हात पकडल्याशिवाय कोणीही पुढं जायचं नाही. त्याचा पूर्ण ग्रुप वर होल्ड आहे. सर्वांना एकत्र आणण्याची ताकत त्याच्यात आहे. एकएकाचा हात धरून त्याने पुढं जाऊ दिलं. मस्त मज्जा आली.

नाष्टा झाला आणि प्रवीण आला. आदल्या दिवशी नाही जमलं तरीही तो फक्त आम्हाला भेटण्यासाठी मुंबईहून आला होता. त्याला भेटताना एक वेगळंच समाधान मिळालं. कुणाच्या अध्यात नाही, कुणाच्या मध्यात नाही. आपलं काम भलं आणि आपण भले. म्हणूनच तो सर्वांचा आवडता आहे.

पुन्हा गप्पांची मैफिल जमली. आता सर्वांनी मला टार्गेट केलं. 

*अरे रात्री इतकी थंडी वाजत होती. तू आला नाही माझ्यावर ब्लॅंकेट टाकायला.*-कौट्या

*त्यासाठी तुला रेल्वे स्टेशनवर नाहीतर रामकुंडावर जाऊन झोपावं लागेल.*-जयद्या

माझी मस्करी करतांना त्यांना माझा अभिमान नक्कीच असेल. सर्व माझ्या समाजकार्याची स्तुती करत होते. 

निघण्याची वेळ जवळ आली आणि मन उदास झालं. पंकू आबा ने सर्वांना रावळगाव चे चॉकलेट पॅकेट भेट दिले. रुप्याने लासलगाव चा फेमस चिवडा दिला. चिवडा पॅकेट वर सेव गर्ल चाईल्ड चा सुंदर मेसेज होता. आदल्या दिवशी मनीषा ने आणलेला केक, दिपकने आणलेली दिल्ली मिठाई, अबोली ने आणलेली बर्फी आम्ही फस्त केली होती. 

दीपक छबलानीला मानलं राव. फक्त गेट टू गेदर साठी दिल्ली हुन खास आलेला. मराठीचा शब्दही कळत नाही. पूर्ण वेळ सर्वांचे फोटो काढायचा. त्याच्या डेडिकेशनला सलाम. 

निरोपाची वेळ झाली. ग्रुप फोटो साठी सगळे उभे राहिलो. सगळ्यांनी शेजारच्यांच्या खांद्यावर हात टाकण्याची ताकीद झाली. शेजारी स्वप्ना होती.

*ए अनिल, टाक माझ्या खांद्यावर हात. लाजतोस काय असा?* स्वप्ना म्हणाली. कुठं भेटणार मला अशी सोन्यासारखी माणसं?

सर्वांना पुन्हा लवकर भेटण्याचं आश्वासन देत मी गाडीत बसलो. डोळ्यातून अश्रू ओघळायच्या आत गाडी रस्त्याला लागली. आणि मग मी मागे काय सोडून जातोय याची कल्पना झाली आणि अश्रू पापण्यात रेंगाळले.

प्रचंड मेहनत घेऊन आम्हाला यादगार हे दोन दिवस दिल्या बद्दल संदीप,रूपेश, जयंत, सुनील, जयदीप यांचे आभार मानून त्यांचा अपमान मी करणार नाही. ते उपकार माझ्यावर शेवट पर्यंत राहू देत.

हे देवा, कधीकाळी तुला माझ्यावर खुश होऊन मला दीर्घायुषी करावंसं वाटलंच तर एवढंच कर, माझ्या या मित्र मैत्रिणींना उदंड आयुष्य दे. तुझा हेतू निश्चित साध्य होईल......

Dr. Anil Kanade

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

ये कहॅा आ गये हम..यॅूं ही साथ साथ चलते

What did I learn from this lock down ?........